वारकऱ्यांसाठी शिंदे सरकारची ’विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र’ योजना

जळगाव लाईव्ह न्यूज | 21 जून 2023 | महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाची आषाढी वारी मोठ्या उत्साहात सुरु आहे. वारकऱ्यांनी पंढरीची वाट धरली आहे. यातच वारकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे.

पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांना शासनातर्फे विमा संरक्षण देणाऱ्या योजनेची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली.

‘विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र’ ही योजना शासनाने जाहीर केली आहे. पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांना शासनातर्फे विमा संरक्षण मिळणार आहे. वारीच्या ३० दिवसांसाठी हे विमा संरक्षण असेल. मदत व पुनर्वसन विभागामार्फत ही योजना राबविण्यात येईल.

या योजने अंर्तगत एखाद्या वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांस ५ लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल. दुर्घटनेत कायमचे अपंगत्व किंवा विकलांगता आल्यास १ लाख रुपये देण्यात येतील.