लोकाभिमुक निर्णय ! बावीस वर्षापासून रस्त्यात असलेली ‘ती’ भिंत मनपाने तोडली

जळगाव लाईव्ह न्यूज । १ जानेवारी २०२३ । महामार्गालगत असलेल्या फोकस ह्युदाईच्या शोरूमपासून ते पिंप्राळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर गेल्या अनेक वर्षापासून एक भिंत उभी होती. या भिंतीमुळे पिंप्राळ्याकडून महामार्गांकडे येणाऱ्या नागरिकांचा मार्ग अडविण्यात आला होता. सदर भिंतीचे अतिक्रमण शुक्रवारी महानगरपालिकेने काढले असून आता पिंप्राळा परिसरातील नागरिकांना महामार्गाकडे येण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

महामार्गापासून (मानराज पुलाजवळ) ते पिंप्राळाच्या मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या मार्गावर गेल्या बावीस वर्षापासून एका व्यक्तीने आडवी भिंत बांधली होती. ह्या भिंतीमुळे महामार्गांवरून पिंप्राळ्याकडे जाणाऱ्यांचा रस्ता बंद झाला होता. तसेच त्या परिसरातील नागरिकांना देखील महामार्गांकडे किंवा पिंप्राळ्याकडे जाता येत नव्हते त्यामुळे स्थानिक नागरिकांनी याबाबत महानगरपालिकेकडे सदर भिंत काढण्याची तक्रार केली परंतु महानगरपालिकेकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे नागरिकांचा हिरमोड झाला होता. वारंवार तक्रारी करूनही कारवाई होत नसल्यामुळे नागरिकांनी मनपा प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला होता. दरम्यान, शुक्रवारी मनपाचा नगररचना विभाग व अतिक्रमण निर्मूलन विभागाने संयुक्त कारवाई करत भिंत तोडल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

  • उपमहापौरांनी केल्या सुचना

भिंतीचे अतिक्रमण काढण्यासाठी स्थानिक नागरिकांकडून तक्रारी करण्यात येत होत्या. परंतु तरीही मनपाकडून कारवाई होत नसल्यामुळे नागरिकांनी आपला मोर्चा उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्याकडे वळविला व सदर भिंत काढण्याची मागणी केली. यावेळी उपमहापौरांनी नगररचना विभागाला चौकशी करून कारवाई करण्याच्या सुचना केल्या होत्या. त्यानंतर नगररचना विभागाचे अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष तेथे जाऊन पाहणी केली होती.