लोकनृत्यातून घडले संस्कृतीचे दर्शन

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ फेब्रुवारी २०२३ । संत-महात्म्यांच्या पदस्पर्शाने पावण झालेल्या फैजपूरातील ऐतिहासीक भूमीवर गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या युवारंग महोत्सवात सळसळत्या तरुणाईच्या उत्साहाला रविवारी अधिकच उधाण आल्याचे दिसून आले. भारतीय लोकनृत्यावर थिरकणारी तरूणाई, लोकसंगीतातील जोष, शास्त्रीय नृत्यातील पदन्यास, नाट्यगीतातील आलाप आणि फाईन आर्टद्वारे साकारलेली कला यामुळे युवारंग युवक महोत्सवातील आजचा तिसरा दिवस अविस्मरणीय ठरला. विद्यार्थी कलावंतांनी तिसर्‍या दिवशी लोकनृत्यातून आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवत वाहव्वा मिळवली. दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून आयोजित युवारंग महोत्सवाचा सोमवार, 13 रोजी समारोप होत असून यात कोण बाजी मारणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

पारंपरीक पोषाखातून घडले संस्कृतीचे दर्शन
रंगमंच क्रमांक एकवर सहभागी विद्यार्थ्यांनी लोकनृत्यातून संस्कृतीचे दर्शन घडविले. वारकर्‍यांची दिंडी, आदिवासी नृत्य, पारंपरीक नृत्य, पावरी नृत्य सादर करण्यात आले तर ढोल ताशांच्या तालावर थिरकणार्‍या स्पर्धकांनी उपस्थितांना टाळ्यांचा कडकडाट करण्यास भाग पाडले. अग सुटला माझा पदर बाई मी नव्हती भानात, अन अंबाबाईच वारं माझ्या भरल्या अंगात या समुह नृत्याने सार्‍या तरूणाईने जल्लोष केला.

पारंपारिक पोषाखातून संस्कृतीचे दर्शन
भलरी, पावरीनृत्य, आदीवासी डोगंरातील गीत, बंजारानृत्य, कोळीनृत्य, ग्रामीण आदीवासी, खंडेरायाच्या लग्नाला, बंजारा लंबाडीया, होळी सण आदी नृत्याचे प्रकार ढोल, नगारा, घुंगरू या वाद्यांच्या सहाय्याने स्पर्धक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. विविध पारंपरीक पोषाखातून संस्कृतीचे दर्शन घडताना दिसत होते. समुहनृत्य प्रकार हा सर्वाधिक गर्दी खेचणारा रंगमंच ठरला. शिट्टयांच्या गजरात वन्समोअरची मागणी प्रेक्षकांमधून होत होती. आदिवासी नृत्य करणार्‍या महिला स्पर्धकांनी आकर्षक पेहराव व त्यावर परीधान केलेली दागिणे हे विशेष आकर्षण ठरले. टाळ मृदुंग, झां च्या सहाय्याने वारकरी संप्रदायातील नृत्याने परीसर भक्तिमय झालेला दिसून येत होता. प्रत्येक सहभागी स्पर्धक आपली कला जास्तीत-जास्त चांगल्याप्रकारे सादर करण्याकरीता प्रयत्नशील होता. या कला प्रकारात 24 महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला.