रावेर तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे झाले तब्बल ‘इतक्या’ कोटींचे नुकसान

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जून २०२३ । रावेर शहरासह आजूबाजूच्या खेड्यांवर वादळी वाऱ्यासह पावसाने दि. ८ रोजी संध्याकाळी सात वाजता थैमान घातले. या वादळात रावेर शहरातील तब्बल १२० घरांवरील पत्रे उडाली. घरांवर झाडे पडली विजांचे खांब वाकून तारा तुटल्या असून अनेकांचे संसार उघड्यावर आले. तसेच केळी बागा मोठ्या प्रमाणावर आडव्या झाल्या असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.तालुक्यात ५८ कोटीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे सांगण्यात आले आहे.

आमदार शिरीष चौधरी यांनी तहसीलदार बंडू कापसे यांच्याशी संपर्क साधून लवकरात लवकर नुकसान झालेल्या घरांचे आणि केळी भागांचे पंचनामे करून नुकसान झालेल्या घरांना शक्य असेल तेवढी लवकर तात्काळ आपत्कालीन मदत देण्याच्या सूचना केल्या आहे.आ.शिरीष चौधरी यांची एन्जोप्लास्टी सर्जरी झाल्याने सध्या ते पुणे येथील रुग्णालयात दाखल असून रावेर शहरातील व परिसरातील रमजीपूर, बक्षीपूर, केऱ्हाळा खुर्द, सिंदखेड, खानापूर, पिंप्री, अहीरवाडी, जुनोना, कर्जोद, गावांमधील घरांचे व २७ गावमधील केळी बागांच्या झालेल्या नुकसानी बाबत. लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळणेची मागणी करणार आहेत.

दि.८ जून रोजी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास प्रचंड वादळ अवकाळी पावसाने तब्बल ५० मिनिटे थैमान घालत रावेर शहरात सुमारे १२० घरांचे पत्र उडून, घरांवर झाडे, विजखांब पडून नुकसान झाले असून तालुक्यातील २७ गावांमधील केळी भागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून केळी भागांचे ५६ कोटी ६८ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे कृषी आणि महसूल विभागाच्या वतीने प्राथमिक अंदाज वर्तविला असून दहा गावांमधील घरांचे नुकसान झाल्याचा अहवाल महसूल प्रशासनाने व कृषी विभागाने शासनाकडे सादर केला आहे.

नुकसानग्रस्त केळी बागा आणि घरांच्या पंचनाम्यांचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. त्यामध्ये २७ गावांमधील १ हजार ६५२ शेतकऱ्यांचे १ हजार २५२ हेक्टर क्षेत्रावरील केळी बागा जमीन दोस्त झाल्या असून सुमारे ५६ कोटी ६८ लाख रुपयाचे नुकसान झाल्याचा प्रशासनाचा अंदाज आहे.यामध्ये अहिरवाडी येथे एक गाय आणि एक म्हैस आणि जुनोने येथे एक गाय दगावली आहे.

वादळ झाल्यानंतर संध्याकाळीच तहसीलदार यांनी परिसरात पाहणी करीत असताना संपूर्ण रस्त्यांवर झाडे आडवी पडली होती विजांचे खांब वाकून तारा तुटलेल्या होत्या. रावेर शहराच्या बाहेर जाणारे सर्वच रस्ते बंद झालेले होते. रात्री उशिरापर्यंत प्रशासनाने रस्त्यांवरील झाडे हटवली. आणि रस्ते मोकळे केले. त्याचप्रमाणे विजेच्या खांबा वाकून तारे तुटलेली असून वीज वितरण कंपनीने युद्ध पातळीवर काम सुरू केले आहेत. या वादळामुळे वीज वितरण कंपनीचे अंदाजीत सुमारे ३५ लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे अभियंता अनिल पाटील यांनी सांगितले. वादळामुळे तारांवर झाडे पडून खांबा वाकले मुळे ८ च्या रात्रीपासून वीज गेलेली होती. दि.९ रोजी संध्याकाळपर्यंत आलेली नव्हती. वीज वितरण कंपनी कर्मचारी व अधिकारी वीस पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करीत होते.