मध्य रेल्वेच्या दहा कर्मचार्‍यांना संरक्षा पुरस्कार प्रदान

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ नोव्हेंबर २०२२ । सप्टेंबर व ऑक्टोंबर महिन्यात काम करतांना सतर्कता बाळगल्याने मोठ अनर्थ टळल्याने भुसावळ विभागातील ट्रॅक मेंटेनर व उपस्टेशन मॅनेजर यांना महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांच्याहस्ते संरक्षा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मध्य रेल्वेतील मुंबई, पुणे, नागपूर, भुसावळ आणि सोलापूर विभागातील प्रत्येकी दोन रेल्वे कर्मचार्‍यांना महाव्यवस्थापक संरक्षा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कारामध्ये पदक, प्रशंसा प्रमाणपत्र, अनुकरणीय सुरक्षा कार्याचे प्रशस्तिपत्रक आणि दोन हजार रुपये रोख पुरस्काराचा समावेश होता.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
उपमहाव्यवस्थापक आलोक सिंग, प्रधान मुख्य संरक्षा अधिकारी डी.वाय.नाईक, प्रधान मुख्य परीचालन व्यवस्थापक मुकुल जैन, प्रधान मुख्य अभियंता राजेश अरोरा, एन.पी.सिंग, शिशिर दत्त आणि मध्य रेल्वेचे अन्य विभागांचे प्रमुख उपस्थित होते. रेल्वे प्रशासनातर्फे दोन महिन्यात जे कर्मचारी चांगले कामे करतात, अश्या कर्मचार्‍यांचा गौरव करून त्यांना मुंबई येथे सन्मानीत केले जाते. यंदा सुध्दा सप्टेंबर, ऑक्टोंबर या महिन्यात उत्कृष्ठ काम करणार्‍यांचा गौरव करण्यात आला. ट्रॅक मेंटेनर राजकुमार डोमन यांनी 15 ऑक्टोंबर 2022 या दिवशी पेट्रोलिंग ड्युटीवर असताना किलोमीटर 434/26 येथे रुळाच्या तड्यातील 80 मिलिमीटर अंतर पाहिले. त्यांनी तत्काळ ट्रॅकचे संरक्षण केले आणि संबंधित अधिकार्‍यांना याची माहिती दिल्यानंतर तातडीने उपाययोजना राबवण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली. डोमन यांची रेल्वेत 38 वर्ष सेवा झाली आहे. ते भादली येथे वास्तव्यास आहेत.

जळणारे अ‍ॅक्सल दिसले
विभागातील पाडळी रेल्वे स्थानकाचे उपस्टेशन मास्तर विवेक कुशल प्रकाश यांना 14 सप्टेंबर 2022 या दिवशी कर्तव्यावर असतांना मालगाडीद्वारे सिग्नल्सची देवाण-घेवाण करताना, एका वॅगनमध्ये एक्सल (हॉट) जळत असल्याचे दिसले. त्यांनी ताबडतोब सर्व संबंधितांना सावध केले, घोटी स्थानकावर मालगाडी थांबवण्यात आली. तेथे अन्य वॅगनपासून ही वॅगन वेगळी करण्यात आली आणि नंतर गाडी सोडण्यात आली. त्यांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे. विशेष म्हणजे विवेक प्रकाश यांना रेल्वेत फक्त एकच वर्ष झाले आहे.