पोलिसांचा दणका : ९ वाळूचे ट्रॅक्टर पकडले, २ नदीत फसले

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ नोव्हेंबर २०२१ । शहरात गेल्या काही दिवसांपासून बेसुमार अवैध वाळू वाहतूक सुरू आहे. अवैध वाळू वाहतुकीला लगाम घालण्यासाठी सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा सोमवारी स्वतः नदीपात्रात उतरले. पोलिसांच्या कारवाईत वैजनाथ पांथा नदीपात्रातून नऊ ट्रॅक्टर पकडण्यात आले आहे. दरम्यान, पळ काढताना दोन ट्रॅक्टर नदीपात्रातच फसले असून दोन चालकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

नदीपात्रातून वाळू उपसा करण्याच्या ठेक्याची मुदत संपल्यानंतर देखील दररोज बेसुमार वाळू उपसा केला जात आहे. शहरातून सायंकाळनंतर मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक होत असते. अवैध वाहतुकीला लगाम घालण्यासाठी सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा हे सोमवारी पथकासह थेट गिरणा पात्रात जाऊन धडकले.

वैजनाथ-सावखेडा शिवारातील गिरणा नदी पात्रात सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पथक पोहोचताच वाळूमाफियांची भंबेरी उडाली. धरपकड सुरू करताच अनेकांनी पळ काढला. कारवाईत नऊ ट्रॅक्टर पोलिसांच्या हाती लागले असून पळ काढण्याच्या प्रयत्नात दोन ट्रॅक्टर नदी पात्रात फसले आहेत. पोलिसांनी दोन चालकांना ताब्यात घेतले असून ७ ट्रॅक्टर तालुका पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे. नदी पात्रात फसलेले दोन ट्रॅक्टर काढण्यासाठी जेसीबी किंवा पोकलँनची मदत घेतली जाणार आहे.

आज केलेल्या कारवाईत जमा करण्यात आलेल्या ट्रॅक्टरच्या चालक-मालकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा यांनी दिली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज