निंदणी करताना शॉक लागून महिलेचा मृत्यू

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज| तुषार देशमुख | शेतात निंदणी करत असताना शॉक लागल्याने 36 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना चाळीसगाव तालुक्यातील बिलाखेड येथे दुपारी घडली आहे. दरम्यान महावितरण कंपनीच्या बेजबाबदारपणा मुळेच महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

तालुक्यातील बिलाखेड येथील राजाराम भिकन पाटील यांच्या शेतात निंदणीचे काम सुरू होते. काही मजूर महिला निंदणीचे काम करीत असताना आज शनिवार दिनांक 11रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास पावसामुळे खंडित झालेल्या विद्युत वाहिनीला धक्का लागल्याने उषाबाई रवींद्र कोळी यांना विजेच्या तारेचा शॉक लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर मंगल संभाजी गायकवाड ही महिला गंभीर जखमी झाली. घटनेची माहिती मिळताच आसपासच्या शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन वीजपुरवठा खंडित केल्यानंतर उषाबाई कोणी यांच्यासह मंगल गायकवाड यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून उषाबाई कोळी यांना मृत घोषित केले. व मंगल गायकवाड यांच्यावर उपचार सुरू आहे.

 

या प्रकरणी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या खबरीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या दुर्दैवी घटनेने बिलाखेड गावात हळहळ व्यक्त होत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -