fbpx

धार्मिक शिक्षणासाठी कब्जा केलेली जागा घेतली मनपाने ताब्यात

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ सप्टेंबर २०२१ । महापालिकेच्या शाळेसाठी कराराने मिळालेल्या शाहूनगरातील जागेवर त्रयस्थ संस्थेने कब्जा केलेला हाेता. ही जागा महापालिकेची नसल्याने जागा मालकाच्या तक्रारीवरून अतिक्रमण विभागाने बुधवारी दुपारी कारवाई करत जागेला सील ठाेकले. कारवाईला विराेध करत स्थानिक नागरिकांनी गाेंधळ घातला. त्यानंतरही प्रशासनाने कारवाईवर ठाम राहत जागेचा ताबा मिळवला.

शाहूनगरातील पिंप्राळा राेडवरील पान सेंटरच्या जवळ एका व्यक्तीने महापालिकेला शाळा सुरू करण्यासाठी कराराने सुमारे तीन हजार चाैरस फूट जागा कराराने दिली हाेती. बरीच वर्षे त्या जागेवर शाळा देखील सुरू हाेती. दरम्यानच्या काळात या जागेतील चार खाेल्यांचा ताबा घेत एका बहुउद्देशीय संस्थेने ताबा घेत त्या ठिकाणी धार्मिक शिक्षण देण्यास सुरुवात केली हाेती. या संदर्भात जागा मालकाने महापालिकेकडे तक्रार करत महापालिकेला दिलेल्या जागेवर खासगी व्यक्तीचा ताबा असल्याचे कळवले हाेते. त्यामुळे महापालिकेने त्या जागेचा ताबा घेत कारवाईचा निर्णय घेतला हाेता.

गेल्या महिन्यात झालेल्या महासभेत या जागेसंदर्भात अशासकीय प्रस्ताव मंजूर करण्यात आला हाेता. वास्तविक महापालिकेच्या मालकीची जागा नसताना अशा पद्धतीने ठराव करता येत नाही. जागेचा ताबा घेऊन चाबी बांधकाम विभागाकडे देण्यात आली आहे.

पालिकेचे उपायुक्त संताेष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाचे पथक जागेचा ताबा घेण्यासाठी दुपारी १२ वाजेच्या सुमारास रवाना झाले. या वेळी त्रयस्थ संस्था ताबा घेऊ शकत नसल्याने कारवाई करण्यास सुरुवात केली असता नागरिकांनी विराेध करण्यास सुरुवात केली. बरीच गर्दी वाढल्याने तणावात वाढ झाली हाेती. त्यामुळे पालिकेला सुमारे दीड तास थांबून रहावे लागले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज