दुर्दैवी : श्वसननलिकेत उलटी अडकल्याने बालिकेचा मृत्यू

जळगाव : शाळेतून परतल्यानंतर घरी आलेल्या आठ वर्षीय चिमुकलीचा श्वसननलिकेत उलटी अडकल्याने मृत्यू ओढवला. जळगाव शहरातील रामपेठ भागात ही दुर्दैवी घटना शुक्रवार, 24 फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. अनुष्का मुकेश भोई (जावरे, 8) असे मयत चिमुकलीचे नाव आहे.

कुटूंबातील एकुलती एक पणती विझली
जळगाव शहरातील महापालिकेची शाळा क्रमांक तीनमधील सिनियर केजी या वर्गात शिक्षण घेणारी अनुष्का शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे शाळेत गेल्यानंतर दुपारी शाळा सुटल्यानंतर घरी आली मात्र अंग गरम असल्याने तिला ताप आला म्हणून आईने तिला झोपविण्याचा प्रयत्न केला. यावेळी अनुष्काला अचानक दोन वेळा उलटी झाली. पाणी पिल्यानंतर अनुष्का पुन्हा झोपली मात्र तिला पुन्हा उलटीचा त्रास जाणवू लागला व झोपली असतांनाच पुन्हा उलटी झाली मात्र श्वसननलिकेत अडकल्याने तिला श्वास घ्यायला त्रास झाला व यातच ती बेशुध्द पडली. आई-वडीलांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी तिला तपासून मयत घोषित केले. एकूलत्या एक मुलीच्या अचानक मृत्यूने आई-वडिलांना मोठा मानसिक धक्का बसला आहे.