दिव्यांग कल्याण राष्ट्रीय समिती सदस्यपदी – यजुवेंद्र महाजन

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ नोव्हेंबर २०२१ । दीपस्तंभ फाउंडेशन मनोबलचे संस्थापक यजुवेंद्र महाजन यांची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगांतर्गत दिव्यांग कल्याण राष्ट्रीय समितीमध्ये नेमणूक करण्यात आली असून, केंद्रीय स्तरावरील या समितीत देशातील दहा व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे.

आयोगाच्या अंतर्गत दिव्यांगांच्या संदर्भातील शासकीय धोरण, नियम यांचा आढावा घेणे, त्यामधील बदल सुचविणे तसेच अंमल बजावणी होण्यासाठी प्रयन्त करणे असे या समितीचे कार्य आहे. त्यासोबतच दिव्यांगांच्या बाबतीत मानवाधिकार संदर्भातील राष्ट्रीय पातळीवरील समस्यांचे निराकरण होण्यासाठी प्रयत्न करणे. दिव्यांगांच्या बाबतीतील समस्यांचा व त्यांच्या भविष्यातील धोरणांचा वेगवेगळ्या राज्यामध्ये आणि देशामध्ये जाऊन अभ्यास करणे या संदर्भात या समिती सदस्यांचे कार्य असणार आहे.

२२ राज्यांतील ५०० दिव्यांगांना प्रशिक्षण

यजुवेंद्र महाजन यांनी राष्ट्रीय स्तरावरील दिव्यांगांचा उच्च शिक्षण स्पर्धा परीक्षांचा निवासी प्रकल्प जळगाव पुणे येथे उभारल्यामुळे त्यांचा या समितीत समावेश करण्यात आलेला आहे. दीपस्तंभ फाउंडेशनच्या मनोबल प्रकल्पात २२ राज्यातील सुमारे ५०० दिव्यांग व अनाथ विदयार्थ्यांना वर्षभर वेगवेगळे प्रशिक्षण दिले जाते. देशातील या प्रकारचा हा पहिलाच प्रकल्प आहे. या निवडीबाबत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी त्यांचे विशेष कौतुक केले आहे. दिव्यांगाच्या सक्षमीकरणाच्या धोरणाशी सुसंगत राहून व त्यांच्या विविधांगी समस्यांवर मात करण्याच्या दृष्टीने या पदाच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न भविष्यात करणार असल्याचे प्रतिपादन महाजन यांनी केले आहे.

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज