तोतया पोलीस बनून ७० वर्षीय शेतकऱ्याला लुटले

जळगाव लाईव्ह न्यूज । १ जून २०२२ । या परिसरात चोऱ्या वाढल्या आहेत, तुमच्या अंगावरील सोने काढून गाडीच्या डिक्कीत ठेवा’ असा सल्ला देत दोन तोतया पोलिसांनी एका ८० वर्षीय शेतकऱ्याच्या अंगावरील १ लाख २६ हजार रुपयांचे सोने हातचलाखीने लुटून घेतले. ही घटना ३० मे रोजी सकाळी १० वाजता जळके-लोणवाडी रस्त्यावर घडली.

श्यामराव लोटू तायडे (वय ८०, रा. दौलतनगर) यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. तायडे हे निवृत्त वायरमन आहेत. त्यांची जळगाव तालुुक्यातील लोणवाडी शिवारात आठ एकर जमीन असून, ते सध्या शेती करीत आहेत. शेतीकामाच्या निमित्ताने ३० रोजी सकाळी १० वाजता ते दुचाकीने (क्रमांक एमएच-१९, बीएक्स-५६३५) लोणवाडीकडे जात होते. यावेळी त्यांना रस्त्यात दोन जणांनी हात देऊन थांबवले. पोलिस असल्याचे भासवून ‘साहेबांनी आमची ड्यूटी इकडे लावली आहे. या भागात चोऱ्या हाेत आहेत. तुमच्या अंगावरील चेन, अंगठी काढून गाडीच्या डिक्कीत ठेवा’ असे त्यांनी सांगितले. त्यानुसार तायडे यांनी अंगठी व चेन काढून रुमालात गुंडाळून डिक्कीत ठेवत असताना त्या पैकी एकाने स्वत: हातात घेत डिक्कीत ठेवून देतो असे सांगितले. तर दुसरा भामट्याने त्यांना बोलण्यात गुंतवून ठेवले. हातचलाखी करून ताेतया पोलिसांनी हे सोने काढून घेतले.

तोतया पोलीसांचे वर्णन
एक भामटा ४५ ते ५० वयोगटातील असून, त्याची उंची सहा फुटापर्यंत आहे. तर दुसरा ३५ ते ४० वयोगटातील आहे. दोघांनी तोंडाला रुमाल बांधलेले असल्यामुळे तायडे यांनी त्यांचे चेहरे पाहिले नाही. भामट्यांकडील दुचाकीची डिक्की, सीट कापडाने झाकली हाेती.