तीळगुळ घ्या आणि जुनी पेन्शन द्या ; महिलांच्या आंदालनाने वेधले लक्ष

जळगाव लाईव्ह न्यूज : १९ मार्च २०२२ : भुसावळ येथे जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीसाठी शासकीय, निमशासकीय कर्मचारी, खाजगी प्राथमिक, माध्यमिक, जिल्हा परीषद शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मंगळवारपासून संपावर गेले आहे. शनिवार, 18 रोजी मोठ्या संख्येने कर्मचार्‍यांनी काळ्या पोशाखात ‘तीळगुळ घ्या आणि जुनी पेन्शन द्या’ अशा घोषणा देत आंदोलन केले. सकाळी 11 वाजता शिक्षण, आरोग्य, महसूल, ग्रामसेवक, पाटबंधारे विभाग अशा विविध विभागातील संपकरी कर्मचार्‍यांनी मोठ्या संख्येने पंचायत समिती येथे एकत्र येत सलग पाचव्या दिवशी आंदोलन केले.

शेतकर्‍यास वाहिली सामूहिक श्रद्धांजली
राज्यात न्याय हक्कासाठी शेतकरी आंदोलन करत आहेत. बहुसंख्य शासकीय कर्मचारी ही शेतकर्‍यांची मुले आहेत. शेतकरी मोर्चा सुरू असताना पुंडलिक अंबादास जाधव या शेतकर्‍याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या शेतकर्‍यास सर्व विभागातील कर्मचार्‍यांनी श्रद्धांजली देऊन शेतकरी आंदोलनाबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या.

आंदोलनास वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा
जुन्या पेन्शन साठीच्या कर्मचार्‍यांच्या आंदोलनास वंचित बहुजन आघाडीने आज पाठिंबा दिला. कर्मचार्‍यांच्या न्याय हक्कासाठी सुरू असलेल्या या आंदोलनास आम्ही पाठिंबा देत असून सोबत असल्याचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांनी सांगितले.

सरकारी व निमसरकारी कर्मचार्‍यांची समन्वय समितीची बैठक
सरकारी व निमसरकारी कर्मचारी समन्वय समितीच्या बैठकीत आगामी थाळी नाद आंदोलन, काळा दिवस, माझे कुटुंब माझी पेन्शन अभियान याबाबत चर्चा करून आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक संघ, माध्यमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी महासंघ, शिक्षक समन्वय समिती, कृषी विभाग लिपिक संवर्ग संघटना, कृषी सहाय्यक संघटना, तलाठी संघटना, इब्टा शिक्षक संघटना, शिक्षक भारती, माध्यमिक शिक्षक परिषद, उच्च माध्यमिक संघटना, जुनी पेन्शन हक्क संघटना, शिक्षकेतर कर्मचारी संघटना, बहुजन शिक्षक संघटना, कास्ट्राईब शिक्षक संघटना, प्राथमिक शिक्षक भारती संघटना, अखिल भारतीय महिला शिक्षक संघटना, कास्ट्राईब प्राथमिक शिक्षक संघटना, जळगाव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ, टीडीएफ संघटना, पाटबंधारे विभाग संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.