..तर आ. एकनाथराव खडसे होणार विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते!

जळगाव लाईव्ह न्यूज । चिन्मय जगताप । एकीकडे शिवसेना नाव आणि शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह दोन्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेल्याने आता विधानपरिषदेतील ठाकरे गटाचे विरोधीपक्ष नेतेपद सुद्धा जाईल अश्या चर्चा रंगू लागल्या आहेत. यातच अंबादास दानवे यांचे विधानपरिषद विरोधी पक्षनेते पद गेले कि त्यांच्या जागी राष्ट्र्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस दावा सांगेल असे म्हटले जात आहे. या पदावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दावा केल्यास ते जळगाव जिल्ह्यातील नेते माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे यांना मिळू शकते. (eknath khadse leader of opposition)

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह असे दोन्ही एकनाथ शिंदे यांना मिळाल्याने विरोधी पक्षनेते दानवे हे आता सत्तापक्षाचा भाग असल्याचे कारण देत त्यांना पदावर ठेवू नये, अशी भूमिका आता शिवसेनेकडून घेतली जावू शकते. तसे झाले तर दानवे यांचे विरोधी पक्षनेतेपद अडचणीत येईल. अर्थात विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे त्याला मान्यता देतील का? याबाबत शंका आहे.

ठाकरे यांच्याकडे विधान परिषदेत १२, राष्ट्रवादी व काँग्रेसकडे प्रत्येकी ९ सदस्य आहेत. ठाकरेंचे आमदार सोडले तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे खडसें इतका मोठा आणि अनुभवी आमदार वरच्या सभागृहात म्हणजेच विधानपरिषदेत नाही. यामुळे जर अंबादास दानवे यांनी राजीनामा दिला तर खडसे यांची विधानपरिषदेच्या विरोधीपक्ष नेतेपदी वर्णी लागू शकते.

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ९ जागा आणि राज्यपाल नियुक्त १२ जागा अद्याप रिक्त आहेत. तर दुसरीकडे निवडणूक आयोगाच्या निकालाविरुद्ध ठाकरे यांच्यामार्फत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या आदेशाला स्थगिती दिली तर विरोधी पक्षनेते बदलण्याच्या हालचालीना ब्रेक लागेल.