जेमतेम आर्थिक स्थिती असंलेल्या पत्रकारावरील उपचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन!

जळगाव लाईव्ह न्यूज | २२ मार्च २०२३ | जळगाव येथील ज्येष्ठ पत्रकार तथा ‘सकाळ’ मधील माजी सहकारी शिवाजी जाधव हे गेल्या काही महिन्यांपासून दुर्धर आजाराशी झगडत असून यासाठी त्यांच्यावर यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करणे आवश्‍यक बनले आहे.

त्यांची जेमतेम आर्थिक स्थिती लक्षात घेता समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन आर्थिक मदत करावी, असे आवाहन ‘सकाळ’च्या वतीने करण्यात येत आहे.

शिवाजी जाधव हे गेल्या २५ वर्षांपासून जळगाव जिल्ह्यातील माध्यम क्षेत्रात कार्यरत असून एक व्यासंगी व अभ्यासू पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे. सामाजिक, राजकीय तसेच विविध विषयांवरील त्यांचे विपुल लेखन प्रसिद्ध झाले आहे. आज मात्र ते दुर्धर आजाराशी झगडत आहेत.

अनेक महिन्यांपासून आजारी असल्याने त्यांचे यकृत जवळपास निकामी झाले असून त्यासाठी केवळ यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया हाच एकमेव पर्याय आहे. ही प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट व खूप खर्चिक असून श्री. जाधव यांची आर्थिक स्थिती अगदीच बेताची आहे.

लहान मुलगा, मुलगी व पत्नी अशा या कुटुंबावर आजारामुळे मोठा आघातच झाला आहे. या स्थितीत समाजातून या पत्रकारासाठी मदत उभी राहणे गरजेचे आहे. दानशूर व्यक्तींनी श्री. जाधव यांच्यावरील उपचारासाठी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने करण्यात येत आहे.

मदतीसाठी या खात्यावर रक्कम जमा करावी

शिवाजी जाधव यांना आर्थिक मदतीसाठी मानसी शिवाजी जाधव यांच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यावर इच्छेनुसार आर्थिक मदत करावी, अशी विनंती जाधव कुटुंबीयांनी केली आहे.

खात्याचा तपशील

नाव : मानसी शिवाजी जाधव

बँक : स्टेट बँक ऑफ इंडिया

शाखा : शिवकॉलनी, जळगाव

बचत खाते क्रमांक : 20265372310

IFSC No. : SBIN0012689

(बातमी साभार – सकाळ)