जाती धर्माच्या पलीकडे गोपीनाथराव- एकनाथराव यांचे नाते

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मे २०२२ । सर्व जातीधर्माच्या पलीकडे जाऊन माजी मंत्री गोपीनाथराव-एकनाथराव यांच्या कुटुंबाचे नाते होते. एकेकाळी भाजपाला तळागाळात, बहुजन समाजात ओळख देण्याचे काम गोपीनाथराव मुंडे, एकनाथराव खडसे यांनी केले होते. गोपीनाथराव मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली संघर्षातून शिकता आले, असे प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना.धनंजय मुंडे यांनी केले.

येथील मेहरूण भागात राज्याचे सामाजिक न्याय व विशेष साहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते गोपीनाथरावजी मुंडे चौक येथे प्रवेशद्वार भूमिपूजन सोहळा व भव्य सत्कार कार्यक्रम शनिवार दि. ७ मे रोजी संध्याकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मंचावरती माजी मंत्री एकनाथराव खडसे, महापौर जयश्री महाजन, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक गुलाबराव देवकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष एजाज मलिक, राष्ट्रवादी महिला आघाडीचे जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, समस्त लाडवंजारी समाज संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत लाडवंजारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, मेहरूणचे नगरसेवक प्रशांत नाईक, मनपातील नगरसेवक राजेंद्र पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष विजय वंजारी, सचिव प्रवीण सानप मंचावर उपस्थित होते.

कार्यक्रमाआधी समस्त लाडवंजारी समाज श्रीराम मंदिर संस्थेच्या वतीने गोपीनाथराव मुंडे चौकात प्रवेशद्वाराचे भूमिपूजन ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमांमध्ये समस्त लाडवंजारी समाज श्रीराम मंदिर संस्थानतर्फे मंत्री धनंजय मुंडे यांचा मानाच्या बैलगाडीचे प्रतीक, शाल-श्रीफळ देऊन तसेच भव्य पुष्पहार देत अध्यक्ष चंद्रकांत लाडवंजारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यानंतर बोलताना माजी मंत्री एकनाथराव खडसे म्हणाले की, गोपीनाथराव मुंडे यांनी राज्यभर बहुजनांचे एकत्रीकरण केले.ब्राम्हण, बनिया यांचा पक्ष अशी ओळख असलेल्या भाजपला बहुजनांचा पक्ष अशी ओळख करून दिली. गोपीनाथराव मुंडे यांच्यासोबत काम करताना संघर्ष केला. गोपीनाथ मुंडे असते तर आज राजकीय स्थिती बदलली असती, असेही एकनाथराव खडसे यांनी सांगितले.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना. धनंजय मुंडे म्हणाले की, गोपीनाथराव मुंडे, एकनाथराव खडसे यांनी बहुजन समाजाचे काम तळागाळात नेले. जाती धर्माच्या पलीकडे जाऊन त्यांनी सामान्य माणसांसाठी काम केले. प्रचंड संघर्ष आयुष्यात करावा लागला. संघर्ष केल्याशिवाय आज जे मला प्राप्त झाले त्याची किंमत होऊच शकत नाही. लाडवंजारी समाज हा मेहनती आहे. गोपीनाथराव मुंडे यांनी समाजासाठी महत्त्वाचे योगदान दिलेले आहे, असेही ना. धनंजय मुंडे यांनी सांगितले.

कार्यक्रमासाठी संस्थेचे संचालक उमेश वाघ, योगेश घुगे, कृष्णा पाटील, नंदू वंजारी, विनोद ढाकणे, किरण वाघ, पिंटू सांगळे, समाधान चाटे,
यांच्यासह मुकेश नाईक, अनील घुगे, भागवत पाटील, संतोष पाटील, योगेश नाईक, एकनाथ वंजारी, धर्मेंद्र नाईक, राहुल सानप, संतोष चाटे, रितेश लाडवंजारी, रामेश्वर पाटील, एकनाथ वाघ, समाधान देशमुख, निलेश वंजारी, ज्ञानेश्वर लाडवंजारी, विशाल लाडवंजारी, आबा ढाकणे, कुणाल सानप आदींनी परिश्रम घेतले.