खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, राजकीय चर्चेला उधाण

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ नोव्हेंबर २०२१ । जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक निवडीनंतर आता अध्यक्षपदाच्या हालचाली सुरू झाल्या असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी मंगळवारी पक्षाध्यक्ष शरद पवार यांची तर बुधवारी अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यामुळे बँकेच्या विद्यमान अध्यक्षा रोहिणी खडसे यांच्यासाठीच त्यांची फिल्डिंग सुरू झाल्याची चर्चा राजकीय गटात सुरू झाली आहे. मात्र, दूध संघाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी ही भेट असल्याचे सांगण्यात आले असून, येत्या ५ डिसेंबर रोजी या कार्यक्रमासाठी जळगावात येण्याचे अजित पवार यांनी मान्य केल्याचेही ऍड.रवींद्र पाटील म्हणाले.

बँकेच्या निवडणुकीवर एकनाथ खडसे यांचा पूर्ण प्रभाव राहिला असून, त्यांनी भाजप आणि काँग्रेसतर्फेही आपल्या मर्जीतल्या लोकांना ठरवून निवडून आणल्याचे चित्र तयार झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक म्हणजे १० संचालक बँकेत निवडून आले असून, त्या खालोखाल शिवसेनेचे सात तर काँग्रेस पक्षाचे तिघे आहेत. भाजपतर्फे आमदार संजय सावकारे हे भाजपचे उमेदवार निवडून आले असले तरी त्यांच्यासाठी भुसावळचे नगराध्यक्ष रमण भोळे यांनी माघार घेतल्यामुळे सावकारे यांच्यावरही खडसे यांचाच वरदहस्त असल्याचे म्हटले जाते आहे. शिवसेनेकडे सात संचालक असले तरी त्यांच्यात एकवाक्यता होण्याची शक्यता कमीच असल्याचे राजकीय विश्लेषकांचे निरीक्षण आहे. अशा परिस्थितीत खडसे यांचेच पारडे जड झाले असून, ते ठरवतील तोच चेअरमन होईल, असे चित्र तयार झाले आहे. त्यात पवारांच्या भेटीमुळे चर्चांना खतपाणी मिळाले आहे.

देवकरांचे भवितव्य अधांतरी असल्याने चर्चांना उधाण 

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे चेअरमनपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे असलेले माजी राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांच्या राजकीय भवितव्याचा निर्णय शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. त्यांच्या बाजूने निर्णय लागला तर ते चेअरमन होतील, हे निश्चित असल्याचे सर्वांकडूनच सांगण्यात येते आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय त्यांच्या विरोधात आला तर चेअरमन कोण? यावर चर्चा रंगल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला पहिल्यांदा चेअरमनपद मिळणार असेल तर त्या परिस्थितीत ऍड. रवींद्र पाटील, डाॅ. सतीश पाटील आणि आमदार अनिल पाटील यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते. कारण एकनाथ खडसे यांनी आपण स्वत: किंवा रोहिणी खडसे या चेअरमन पदासाठी उमेदवार नसतील हे निवडणुकीपूर्वीच सांगितले आहे, असेही आतापर्यंत सांगण्यात येत होते. मात्र, खडसे यांच्या नेत्यांशी झालेल्या गाठीभेटींचे फोटो समाजमाध्यमांवर येताच पक्षांतर्गत हालचालींना वेग आला आहे.

अमोल पाटील उपाध्यक्ष ?

सेनेतर्फे संचालक झालेले अमोल चिमणराव पाटील यांना बँकेच्या उपाध्यक्षपदाची ‘ऑफर’ दिली गेली असल्याचेही सांगण्यात येते आहे. मात्र, अशी कोणतीही ऑफरच काय, चर्चाही नसल्याचे आमदार चिमणराव पाटील यांनी सांगितले. शिवसेनेत असलेल्या अंतर्गत मतभेदांमुळे शिवसेनेतर्फे मात्र, अजून उमेदवार ठरवण्यात यश आलेले नाही, असेही चित्र आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या घरी विवाह समारंभ असल्यामुळे त्यांच्याकडूनही या बाबतीत चर्चा झालेली नाही, असेही सांगितले जाते आहे.

अजित पवार पाचला जळगावात

दरम्यान, एकनाथ खडसे यांच्यासोबत मंत्री अजित पवार यांची भेट घेतलेल्या रवींद्र पाटील यांनी ही भेट दूध संघातील कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यासाठी होती, असे सांगितले. येत्या पाच डिसेंबर रोजी या कार्यक्रमासाठी जळगावात येण्याचे अजित पवार यांनी मान्य केल्याचेही ऍड. रवींद्र पाटील म्हणाले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज