सोमवार, डिसेंबर 4, 2023

अरे बापरे ! एसटीतून झाले तब्बल ६४ लाखांचे सोने लंपास

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जून २०२३ । ६४ लाखांचे सोने परिवहन महामंडळाच्या बस मधून घेवुन जातांना ते चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कुरिअर कंपनीच्या डिलिव्हरी बॉयला बसमध्ये झोप लागल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी सोने लंपास केले.

धुळे, जळगाव, नाशिक व नंदुरबार येथील काही सराफ मुंबईत खरेदी केलेले सोने जय बजरंग कुरिअरच्या माध्यमातून धुळे, नाशिक व नंदुरबारला आणण्याची जबाबदारी विष्णुसिंह शिखरवार (वय ३२ रा. नगलादास जि. आग्रा, हल्ली मुक्काम काळबादेवी मुंबई) या तरुणाच्या जय बजरंग कुरिअर कंपनीकडे देण्यात आली होती. कंपनीनी ही ही जबाबदारी गोविंद सिकरवर नामक कर्मचाऱ्याकडे दिली होती. गोविंदने नाशिक येथील सराफांचे ५० लाखांचे दागिने पोहचवले. त्यानंतर तो नाशिक बायपास गाडीने धुळ्यातील व्यापाऱ्यांच्या सोन्याच्या दागिन्यांच्या डिलिव्हरीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये बसला. या प्रवासादरम्यान चोरट्यांनी डाव साधत धुळे मालेगाव नंदुरबार येथील व्यापाऱ्यांचे सुमारे ६४ लाख ८० हजार रुपयांचे दागिने लंपास केले.

कुरिअर कंपनीचा कर्मचारी गोविंद सिंह हा धुळे आगारात बस आल्यानंतर देखील झोपेतच होता. त्याला बसमधील प्रवाशांनी जागे केले. त्यानंतर गोविंदने कंपनीच्या वरिष्ठांना कळवत पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी सोने खरेदीच्या मूळ पावत्या मागितल्या, तसेच पडताळणीनंतर विष्णूसिंह निनुआ शिकरवार (वय ३२, रा. काळबादेवी, मुंबई) याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला.