‘अजिंठा’चा सातकुंड धबधबा ओसंडून वाहतोय, वाघूरच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार
जळगाव लाईव्ह न्यूज । ७ सप्टेंबर २०२१ । जळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर नदीचा उगम अजिंठा लेण्यांजवळील डोंगर भागामध्ये असून काळापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने वाघूर नदी दुथडी भरून वाहत आहे. दरम्यान, अजिंठा लेणीजवळील सातकुंड धबधबा देखील कोसळू लागला असून इतर लहानमोठे धबधबे देखील कोसळू लागले आहेत.
जगप्रसिद्ध अजिंठा लेणीच्या डोंगर भागात वाघूर नदीचा उगम असून गेल्या दोन दिवसांपासून नदीच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे.
अजिंठा डोंगर रांगा ह्या यू (U) आकाराच्या असून त्याच्या मधोमध असलेल्या भागातून वाघूर नदीचा उगम होतो. त्याच ठिकाणी सातकुंड धबधबा असून तो ७ ठिकाणाहून टप्प्याटप्प्याने कोसळतो. अजिंठा लेणी पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना सातकुंड धबधबा आकर्षित करीत असतो. सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसाने धबधबा खळखळून कोसळत असून वाघूर नदीला देखील पाणी आले आहे.
वाघूर धरणात मोठ्याप्रमाणात पाणी येत असून रात्रीपर्यंत धरणाचे दरवाजे उघडण्यात येतील असा इशारा देखील देण्यात आला आहे. वाघूर धरणातून जळगाव आणि जामनेर शहरला पाणीपुरवठा होतो. सध्या असलेल्या पाण्यातून शहराला २ वर्ष आरामात पाणी पुरवठा होऊ शकतो.