⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

राष्ट्रवादी काँग्रेसचे आगळेवेगळे आंदोलन, नरेंद्र मोदींच्या बॅनरची केली आरती

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मे २०२२ । जळगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेसने वाढत्या महागाई विरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बॅनरची आरती करून आंदोलन केले. पेट्रोल पंपावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसने हे आंदोलन करीत मोदी सरकारचा निषेध केला.

देशभरात महागाईमुळे त्रस्त झालेली असून नागरिक व सामान्य जनता त्यात भरडली जात आहे. हातावर पोट भरणाऱ्या मोल मजुरी करणाऱ्या वर्गाला तर गॅस महागल्यामुळे अन्न शिजवून खाणे देखील जड झालेले आहे. महागाईमुळे मूलभूत गरजा देखील भागविणे अवघड होत आहे. गॅस, पेट्रोल, डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढतच असून डॉलरच्या तुलनेत रुपया कमी होत चालला आहे. केंद्र सरकार या सर्वांकडे लक्षच देत नाही.

या सर्व अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस शहरतर्फे आज दि.२१ रोजी जळगाव शहरात पेट्रोल पंपावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोला हार मारून आणि आरती ओवाळून आंदोलन करण्यात आले. प्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष रिकू चौधरी, राष्ट्रवादी अल्पसंख्याक आघाडीचे सरचिटणीस एजाज मलिक, राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, युवक अध्यक्ष रीकु चौधरी, सुनील माळी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

केंद्र सरकारच्या या भांडवलशाही धोरणाविरुद्ध आता आवाज उठवण्याची वेळ आली आहे. मोदी सरकारच्या विरोधात सर्वांनी एकत्र येऊन या मोदी सरकारपर्यंत महागाईचा फटका सर्वसामान्य लोकांना कसा बसतो आहे, हे पोहचविणे आवश्यक आहे. मोदी सरकारने आंदोलनाची दखल न घेतल्यास येणाऱ्या काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे.