⁠ 

मुजे महाविद्यालयातील मानव विद्याशाखेतर्फे महात्मा फुले यांना अभिवादन

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ एप्रिल २०२२ । भारतीय शिक्षण व्यवस्थेमध्ये मूलभूत स्वरूपाचे बदल घडवून आणण्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांचे योगदान अमूल्य स्वरूपाचे आहे.  बहुजन जनसमूहातील सर्व लोकांसाठी आणि विशेषतः स्त्रियांसाठी महात्मा फुले यांनी केलेले शैक्षणिक कार्य हे सर्वश्रेष्ठ आहे असे मत डॉ. अनिल क्षीरसागर यांनी व्यक्त केले. 

   सोमवार ११ रोजी  महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त मूळजी जेठा महाविद्यालयातील मानव्य विद्याशाखेच्या वतीने   ‘महात्मा फुले यांचे शैक्षणिक विचार आणि कार्य’ या विषयावरील विशेष व्याख्यान प्रसंगी अनिल क्षीरसागर बोलत होते. 

यावेळी  उपास्थितानी  महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

  यावेळी बोलताना ते म्हणाले, महात्मा फुले यांनी इंग्रज राजवटीमध्ये भारतीय माणसांसाठी सुरू केलेली शैक्षणिक संकुले ही बहुजन समाजाच्या उत्थानाची केंद्र ठरली.  सावित्रीबाईंसोबत महात्मा फुले यांनी मुलींसाठी सुरू केलेल्या शाळा ह्या मुलींना केवळ शिक्षित करण्यापुरत्या मर्यादित नव्हत्या.  त्यांनी सुरू केलेल्या शाळांमधून कोणताही शिक्षण घेणारा मुलगा अथवा मुलगी विवेकी आणि विचारप्रवण बनले पाहिजेत यासाठी फुलेंनी संपूर्ण आयुष्य वाहून घेतले.   महात्मा फुले यांनी हंटर कमिशन समोर केलेले भाषण त्यांच्या शिक्षण विषयक विचारांची दिशा समजून घेण्यासाठी महत्त्वाचे आहे 

     आज शिक्षण क्षेत्रामध्ये आमुलाग्र बदल होत आहेत परंतु हे बदल आपल्या हिताचे आहेत की नाही हे तपासण्याची गरज आहे.  ते तपासायचे असेल तर महात्मा फुले यांचे शिक्षणासंदर्भातील विचार हे आपण प्रत्येकानेच अंतर्मुख होऊन समजून घेतले पाहिजेत आणि वाटचाल केली पाहिजे असे मत त्यांनी यावेळी मांडले.          

     अध्यक्षस्थानी सामाजिक शास्त्र प्रशाळेचे   प्रा. देवेंद्र इंगळे होते.  अध्यक्षीय मनोगतात त्यांनी महात्मा फुले नसते तर काय झाले असते?  आणि महात्मा फुले होते म्हणून काय घडलेले आहे याचा आपण प्रत्येकानेच विचार केला पाहिजे.  तो विचार करण्याचा हा दिवस आहे असे मत व्यक्त केले.   या कार्यक्रमाला महाविद्यालयातील भाषा प्रशाळेचे संचालक प्रा. डॉ. भूपेंद्र केसूर,  डॉ. चंद्रमणी लभाने, प्रा के. के. वळवी,  प्रा. राजीव पवार, डॉ. मनोज महाजन, डॉ. लक्ष्मण वाघ प्रा. संजय हिंगोणेकर प्रा. राहुल सुरडकर प्रा. कुणाल वानखेडे, डॉ. जयेश पाडवी प्रा. गोपीचंद धनगर आदी प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.   सूत्रसंचालन व आभार डॉक्टर योगेश महाले यांनी मानले.