⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

मनपाच्या शाळांमधील विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी आयुक्त विद्या गायकवाड यांनी लढवली ‘ही’ शक्कल

जळगाव लाईव्ह न्यूज : १० मार्च २०२३ : जळगाव महानगरपालिकाच्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या वाढवण्यासह तिथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा मिळाव्या यासाठी मनपाच्या विभाग प्रमुखांकडे शाळा दत्तक देण्यात आल्या आहेत. यानुसार संबंधित विभाग प्रमुखांना शाळांमधील सुविधांचा दर आठवड्याला आढावा घ्यावा लागणार आहे. याबाबतचे आदेश मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी काढले आहेत.

यासंदर्भात आयुक्तांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, शहरात विविध भागांमध्ये महानगरपालिका संचालित प्राथमिक शाळा असून त्या ठिकाणी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत या विद्यार्थ्यांना सर्व मूलभूत सुविधा मिळणे आवश्यक आहे. यात स्वच्छता, स्वच्छतागृहाची व्यवस्था, विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, यासह शाळेत आणखी काय सुविधा पुरवू शकतो. तसेच बांधकाम, पाणीपुरवठा, विद्युत समस्ये सोबत इतर बाबींची पाहणी करणे आवश्यक असणार आहे.

शाळांची जबाबदारी सोपवित मनपाच्या शाळांची यादी देत. त्यासमोर विभाग प्रमुखांचे नाव नोंदवून त्यांच्याकडे त्या त्या शाळांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यानुसार आठवड्यातून एक वेळेस संबंधित विभाग प्रमुखाने शाळेत भेट देऊन त्या ठिकाणी असलेल्या मूलभूत सुविधा व नमूद केलेल्या बाबींची पाहणी करून त्याबाबत अहवाल आयुक्त व शिक्षण विभागाच्या सहाय्यक आयुक्त यांच्याकडे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

याचबरोबर संबंधित मुख्याध्यापकांनी विभाग प्रमुखांना सहकार्य करावे असेही आदेशात म्हटले आहे जे मुख्याध्यापक सहकार्य करणार नाही व जे विभाग प्रमुख याबाबत कारवाई करणार नाही त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल असे आदेशात म्हटले आहे.