⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

भारनियमनामुळे रावेर तालुक्यातील केळी लागवड निम्म्याने घटली

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ एप्रिल २०२२ । गेल्या दोन महिन्यापासून सुरु असलेल्या भारनियमनामुळे रावेर तालुक्यातील केळी लागवड निम्म्याने घटली आहे. कृषी पंपांसाठी वीजपुरवठ्यात झालेली कपात व भारनियमनामुळे शेतीला २४ तासांपैकी फक्त चार-पाच तास वीज मिळत असल्याने नवीन केळी लागवडीवर विपरीत परिणाम झाला आहे.

येत्या दिवसातही पुरेशी वीज मिळेल की नाही, याची शाश्वती नसल्याने केळी लागवड करताना शेतकऱ्यांनी हात आखडता घेतला असून दरवर्षीच्या तुलनेने यंदा आतापर्यंत फक्त निम्मेच लागवड केली आहे. जुन्या केळी बागा वाचवण्यासाठी शेतकरी धडपड करत आहेत.

रावेर तालुक्यात शेतीसाठी वीज वितरण कंपनीने पूर्वी २४ तासांपैकी १० तास वीज पुरवठा करण्याचे नियोजन केले होते. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून १० ऐवजी ८ तास वीज पुरवठा देण्याचे जाहीर केले. आता तर आठ तासही वीज पुरवठा केला जात नसल्याने शेतकरी त्रस्त आहेत. २४ तासात केवळ चार ते पाच तास शेती पंपांना वीज पुरवठा मिळत असल्याने कापणीला आलेल्या केळी बागा वाचवण्यासाठी शेतकरी धावपळ करत आहेत. त्याशिवाय आठवड्यातून किमान दोन दिवस झिरो लोडशेडिंगच्या नावाखाली रात्रंदिवस वीज पुरवठा बंद केला जात आहे.