⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

..तर गिरीश महाजनांना माझा पाठिंबा : आ.एकनाथराव खडसे

जळगाव लाईव्ह न्यूज। ११ फेब्रुवारी २०२३ । गिरीश महाजन मुख्यमंत्री झाले तर त्याला माझा वैयक्तिक पाठिंबा असेल. असं आश्चर्यजनक वक्तव्य राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा गिरीश महाजन यांचे कट्टर वैरी समजले जाणारे आमदार, माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी केले आहे. खडसे यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे सगळीकडे आश्चर्याची लाट पसरली आहे

राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे नेते गिरीश महाजन व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथराव खडसे या दोघांचाही राजकीय प्रवास हा भारतीय जनता पक्षातूनच सुरु झाला. भारतीय जनता पक्षात असताना एकनाथराव खडसे हे गिरीश महाजनांचे वरिष्ठ नेते होते. दोघांचेही चांगले संबंध होते. मात्र गेल्या काही वर्षात दोघांमध्ये बिनसले आणि ते एकमेकांचे कट्टर वैरी झाले.

दोघेही एकमेकांवर टीका करण्यासाठी मिळालेली एकही संधी सोडत नाही. त्यानंतर खडसे यांनी पक्ष सोडला आणि दोघांमधले वैर अजून उफाळून आले. मात्र दुसरीकडे जर गिरीश महाजन मुख्यमंत्री होत असतील तर त्यांना आपल्या पाठिंबा राहील. असे विधान एकनाथराव खडसे यांनी केल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

यावेळी पत्रकारांशी बोलताना एकनाथराव खडसे म्हणाले की, सुरेश दादा जैन मुख्यमंत्री व्हावे यासाठी मी शिवसेनाप्रमुख हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली होती. मात्र मला कार्यक्षम, दूरदृष्टी व सामाजिक हिताचा निकष पूर्ण करणारा मुख्यमंत्री हवा आहे. असे बाळासाहेब म्हणाले होते. आता याच निकशावर जर आता गिरीश महाजन बसत असतील तर मला त्यांच्या मुख्यमंत्री पदासाठी ही कोणतीही अडचण नाही असे एकनाथराव खडसे म्हणाले

सुरेश दादा जैन यांना दिला तसाच पाठिंबा मी गिरीश महाजन यांना देखील देईल. माझ्या भागाचा विकास व्हावा हीच आपली अपेक्षा आहे. परिसरात विद्यापीठ, पशु वैद्यकीय महाविद्यालय, यासह सिंचनासाठी निधी मिळावा व आपला परिसर सुजलाम सुफलाम व्हावा यासाठी माझा कितीही कट्टर दुश्मन असेल तरी मुख्यमंत्री पदासाठी माझा त्यांना पाठिंबा राहील असे एकनाथराव खडसे म्हणाले