⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

खंडित वीजपुरवठ्यामुळे ४ फीडरवर वाढले भारनियमन, व्यापारी त्रासले

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ एप्रिल २०२२ । विजेची मागणी वाढल्याने शहरात महावितरणकडून वीज हानी (गळती) व थकबाकी जास्त असलेल्या चार फीडरवर आपत्कालीन भारनियमन करण्यात येत आहे. शहरातील टिंबर मार्केट या बाजारपेठेतील भागासह, प्रेरणा नगर, इदगाह मैदान व भुसावळ टाऊन या चार फीडरवर हे आपत्कालीन भारनियमन होत असल्याने नागरिकांचा संताप वाढला आहे. कृषी वाहिनीवर देखील आपत्कालीन भारनियमनामुळे भुसावळ तालुक्यातील शेतकऱ्यांवर लागवड केलेला कांदा उपटून फेकण्याची वेळ आली आहे.

महावितरणने जी, जी-१, जी-२, इ व एफ या ग्रुपवर आपत्कालीन भारनियमन सुरु केले आहे. शहरातील गळती व थकबाकीचे प्रमाण जास्त असलेल्या टिंबर मार्केट फीडर, प्रेरणा नगर फीडर, इदगाह मैदान व भुसावळ टाऊन या चार फीडरवर सध्या दररोज वीजपुरवठा खंडित होतो. शहरातील टिंबर मार्केट या फीडरवर बाजारपेठेचा भाग आहे. यामुळे बाजारपेठेतील दुकानदार हैराण झाले आहेत. सोबतच शहरातील इतर सर्व भागात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत. भुसावळ तालुक्यातील कृषी फीडरवर आधीच ८ तास वीज मिळते. त्यातही दोन ते तीन तासांचे आपत्कालीन भारनियमन होते. त्यामुळे लागवड केलेल्या उन्हाळी कांद्याला पाणीपुरवठा करणे कठीण झाले आहे. याचा परिणाम थेट उत्पादनावर होणार आहे. फुलगाव, तळवेल, वेल्हाळे, वरणगाव, साकरी, फेकरी भागात कांदा पीक पाण्याअभावी सुकत आहे.