⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

उद्धव ठाकरे यांच्याकडे भविष्यात काहीच राहणार नाही – गिरीश महाजन

जळगाव लाईव्ह न्यूज । २० फेब्रुवारी २०२३ । भाजपसोबत निवडणूक लढवून जनतेने भाजप व शिवसेनेला स्पष्ट बहुमत दिल्यानंतरही उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस- राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केली. भाजपशी युती तोडणं ही उद्धव ठाकरेंच्या आयुष्यातील खूप मोठी चूक आहे. त्यामुळे आगामी काळात त्यांना पश्चात्ताप करायलाही वेळ मिळणार नाही अशी टीका ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे.

उद्धव ठाकरे यांच्याकडे भविष्यात काहीच राहणार नाही, आता पक्षाचे नावही गेलं, पक्ष गेला, पक्षाचे चिन्ह गेलं आहे. सर्वच हातातून जात असल्याने उद्धव ठाकरे यांचा तोलदेखील जायला लागला आहे. उद्धव ठाकरे स्वतःला एकीकडे शिवसेनेचे मालक म्हणत होते. मात्र, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने खरी शिवसेना बाहेर आली आहे.

शिवसेना आता जनताभिमुख झाली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आता कोणालाही काहीही बोलतील. त्यातच पुढे न्यायालयामध्ये निर्णय झाल्यानंतर ते काय बोलतील याचा नेम नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत आमची विचारांची युती असून, उद्धव ठाकरेंनी आमच्याशी केलेली संधिसाधू युती नसल्याचेही महाजनांनी यावेळी सांगितले.

उद्धव ठाकरे यांच्यासाठी आगामी काळ खूप बिकट राहणार असून, हळूहळू आपल्याला सगळं बघायला मिळेल असेही महाजन यांनी. जेव्हा त्यांनी युती तोडली तेव्हाच त्यांनी निवडणूक घेऊन, जनतेसमोर जायला हवे होते. आता चिन्ह हातातून गेल्यानंतर निवडणुका घेण्याच्या घोषणा देऊन उपयोग नाही, असेही महाजन म्हणाले.