⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

अधिकारांचे विकेंद्रीकरण करणे अत्यावश्यक ; प्रशासकपदाचा भार एकट्याच अधिकाऱ्यावर


जळगाव लाईव्ह न्यूज । ११ एप्रिल २०२२ । जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ.पंकज आशिया यांची जिल्हा परिषदेचे प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात अाली अाहे. सततच्या बैठका, व्हिडिअाे काॅन्फरन्स यामुळे सतत व्यग्र असलेल्या एकट्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यावर प्रशासकपदाचा भार असल्याने जिल्हा परिषदेचे कामकाज प्रभावित हाेत अाहे. त्यामुळे प्रशासकांनी अन्य अधिकाऱ्यांकडे प्रशासक पदाचे अधिकार विकेंद्रित हाेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची मुदत संपल्यानंतर २१ मार्चपासून प्रशासक म्हणून सर्व सूत्रे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हातात अाहेत. जळगावसह राज्यातील अन्य जिल्हा परिषदांमध्येही पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर प्रशासकांची नियुक्ती केली अाहे. या जिल्हा परिषदांमध्ये जिल्हा परिषदेचे दैनंदिन कामकाज, महत्त्वाचे निर्णय यासाठी समित्या गठीत करण्यात अालेल्या अाहेत. त्यात सर्वसाधारण समिती, स्थायी समिती अधिकारासाठी स्वतंत्र समिती, अर्थ समिती, शिक्षण समिती, अाराेग्य समिती स्थापन करण्यात अाली अाहे. जलव्यवस्थापन, बांधकाम, कृषी, पशुसंवर्धन, समाजकल्याण या समित्यांसाठी एकत्रित अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे . पंचायत समिती स्तरावर गटविकास अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती तर स्वतंत्रपणे सरपंच सल्लागार समितीची रचना करण्यात अाली अाहे. चार प्रमुख समित्यांमध्ये या सर्व समित्यांची कामे करण्यात येत अाहे. अधिकारांचे विकेंद्रीकरण करून या समित्या स्थापन केल्यामुळे जिल्हा परिषदेच्या कामांनाही वेग आला आहे. दरम्यान, जळगाव जिल्हा परिषदेत मात्र सर्व अधिकार हे प्रशासकांकडे एकवटले असून, बैठकांसाठी अधिकाऱ्यांना सीईओंवर विसंबून राहावे लागते.